
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या बोरिवली येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे. सदर प्रकार टेंडर नोटीस निघाल्यामुळे समोर आला. मात्र, पालिकेने के. बी. भाभा रुग्णालय, बांद्रे, सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली, एम. टी. अग्रवाल रुग्णालय मुलुंड (प.) आणि महात्मा फुले रुग्णालय या पाचही रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव आखला आहे. जनतेच्या पैशातून उभारलेल्या या रुग्णालयाचे खासगीकरण होऊ देणार नसल्याचे म्युन्सिपल मजदूर युनियनच्या वतीने सांगण्यात आहे. तसेच रुग्णालये वाचविण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव तसेच सरचिटणीस वामन कविस्कर सह पदाधिकाऱ्यांनी दिला.
जनतेच्या पैशातून पालिकेची नवीन रुग्णालये बांधली आहेत, त्यापैकी अजून एकाही रुग्णालयाचे उद्घाटन झालेले नाही. तीच रुग्णालये खासगी संस्थांना देऊन लोकांचे उपचार महाग केले जात आहेत. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. अशी माहिती अशोक जाधव यांनी दिली.
नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. मुंबई महापालिका प्रशासन भांडवली कामामध्ये बुडाली असताना, कायम ठेवीमधील रक्कम कमी झाली आहे. त्यामुळे पालिकेवर आता कर्ज काढण्याची वेळ आली आहे. तरी पालिकेने नवीन रुग्णालये बांधण्याचा निर्णय का घेतला? कोणाच्या सांगण्यावरून हे केले? जनतेच्या पैशातून बांधलेली रुग्णालये खासगी मालकांच्या घशामध्ये का घालण्यात येत आहेत,असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.
भगवती रुग्णालय है अत्याधुनिक सुविधांनी बांधण्यात आले आहे. त्याचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा पूर्वनियोजित कट असल्याची शंका जाधव यांनी व्यक्त केली. तसेच, गेल्या तीन वर्षांपासून पालिकेवर लोकप्रतिनिधींचे अंकुश नसल्याने प्रशासनाला मोकळे रान मिळाले आहे, असा आरोप जाधव यांनी केला.