
मुंबई : बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो अशा मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या गार्डन सेलने पुढाकार घेतला आहे. पवई चांदिवली येथील मीनाताई ठाकरे मैदानाचा कायापालट होणार असून या उद्यानात बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो अशा मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका १९ कोटी १७ लाख ७ हजार ९३२ रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत १०६८ उद्याने आणि मैदाने असून त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी पालिकेने अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची वाढती संख्या आणि सततच्या वापराने या उद्यान, मैदानांना देखभाल, नवीन सुविधांचा समावेश करण्याची गरज भासते. त्यामुळ प्रत्येक काही वर्षाने टप्प्याटप्प्याने उद्याने, मैदानांची डागडुजी केली जाते. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विविध भागातील उद्यान, मैदानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. उद्यानात नवीन फुलझाडे, आधुनिक पद्धतीची आसनव्यवस्था, पायवाटा तसेच मैदानांत जुन्या खेळांची व व्यायामाची साहित्ये बदलून अत्याधुनिक नवी साहित्ये, आवश्यक तिथे मातीचा थर वाढवणे, सुरक्षा भिंती असे विविध बदल करण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारचे खेळ मुलांना उद्यानात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या उद्यानाचा कायापालट!
माटुंगा/धारावी
जे. आर. मेहता उद्यान
शाहू नगर मैदान
रावबहाद्दूर एन शिवराज उद्यान
३ कोटी २ लाख ८४ हजार
घाटकोपर
नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान
जनरल अरुणकुमार वैद्य मैदान
प्रल्हाद केशव अत्रे मैदान
६ कोटी ८० लाख १० हजार
कुर्ला/चांदिवली
माँसाहेब मीनाताई ठाकरे मनोरंजन मैदान
३ कोटी ५० लाख ४१ हजार
चर्नी रोड/कुलाबा/मांडवी
स. का. पाटील उद्यान
वॉल्टर डिसोझा उद्यान
बाबुला टँक मैदान
३ कोटी ९८ लाख ३६ हजार
मालाड/गोरेगाव
लिबर्टी गार्डन
बाबा आमटे मैदान
लोकनायक जयप्रकाश नारायण मैदान
३ कोटी ५६ लाख