थकबाकीदारांची झोप उडाली; ७०२ कोटींच्या ५६५ मालमत्ता जप्त; रक्कम वेळेत न भरल्यास होणार लिलाव - पालिकेचा इशारा

मालमत्ताकराची थकित रक्कम भरण्यासाठी २५ मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
थकबाकीदारांची झोप उडाली; ७०२ कोटींच्या ५६५ मालमत्ता जप्त; रक्कम वेळेत न भरल्यास होणार लिलाव - पालिकेचा इशारा
Published on

मुंबई : मालमत्ताकराची थकित रक्कम भरण्यासाठी २५ मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. २५ मेपर्यंत करभरणा न करणाऱ्या ७०२.७१ कोटींच्या ५६५ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मालमत्ता जप्त केल्यानंतर महिनाभरात थकित रक्कम न भरल्यास जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने दिला आहे.

जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत वर्षाला साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये जमा होतात. परंतु जानेवारी २०२२ मध्ये ५०० चौरस फुटांपर्यंत घरांना करमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे वर्षांला ४६४ कोटी रुपयांचा तोटा पालिकेला सहन करावा लागतो. ५०० चौरस फुटांपर्यंत घरांना करमाफी दिल्याने गेल्या दोन वर्षांत पालिकेला ९२८ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. तर यंदा २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ताकराची बिले २६ फेब्रुवारीपासून पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदा साडेचार हजार कोटींचे टार्गेट पूर्ण करणे करनिर्धारण व संकलन विभागासाठी चॅलेंज होते. मात्र करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले आणि यंदा टार्गेटपेक्षा अधिक म्हणजे ४ हजार ८५६.३८ कोटींचा कर जमा केला. मात्र अनेक थकबाकीदारांनी थकित रक्कम न भरल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त मालमत्तांचा लिलाव करत थकित रक्कम वसूल करण्यात येणार आहे. परंतु लिलाव प्रक्रिया सुरू असेपर्यंत थकित रक्कम भरल्यास संबंधितांची मालमत्ता परत करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या २४ विभागात ७०२.७१ लाखांच्या ५६५ मालमत्ता पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कलम २०३ अन्वये जप्ती व सील करण्यात आल्याचे पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in