मालमत्ता कराची विक्रमी वसुली; एकाच दिवसात आले तब्बल 'इतके' कोटी रुपये; पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाचे यश

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मालमत्ता करवसुली हाच आहे.
मालमत्ता कराची विक्रमी वसुली; एकाच दिवसात आले तब्बल 'इतके' कोटी रुपये; पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाचे यश

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मालमत्ता करवसुली हाच आहे. त्यातच लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाल्याने पालिकेचे बहुतेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र झाले आहेत. अशातच पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने एकाच दिवसात विक्रमी अशी मालमत्ता कर वसुली केली आहे. मंगळवार, १९ मार्च रोजी करनिर्धारण व संकलन विभागाने एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची वसुली केली आहे.

करदात्‍या नागरिकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. कर वसुली करण्यासाठी पालिकेचा करनिर्धारण व संकलन विभाग वर्षभरापासून जोरदार कामाला लागला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवल्यानंतर नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्ताधारकांना नोटीसा देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर पालिकेकडून भर दिला जात आहे.

करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवार, १९ मार्च रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ११ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मालमत्ताकर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ताधारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर तसेच मालमत्‍ताधारकांनी आपला नियमित कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in