पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस वसाहतींची दुरवस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना खासदार रवींद्र वायकर यांनी केली होती.
पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
एक्स @iYogeshRKadam
Published on

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील पोलीस वसाहतींची दुरवस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना खासदार रवींद्र वायकर यांनी केली होती. वायकर यांच्या सूचनेची दखल घेत पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

गृहनिर्माण राज्यमंत्री असताना पोलिसांच्या वसाहतींबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. या प्रश्नी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे रवींद्र वायकर यांनी बैठकीत स्पष्ट करताच, पोलिसांच्या जेवढ्या वसाहती आहेत त्या एकत्र करून त्यांचा विकास करण्यात येणार आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्यामार्फत पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्याचे निश्चित झाले असून याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

तसेच जुने पोलीस ठाणे जे मोडकळीस आले आहे (जसे आरे, मेघवाडी, जोगेश्वरी) तसेच अन्य पोलीस स्थानकाच्या दुरुस्तीचा अथवा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा, गृह विभागाकडे निधी प्राप्त झाला असल्याने ही कामे करण्यात येतील, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कालबाह्य गाड्या रस्त्यात कुठेही ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबईत परिवहन विभागातर्फे स्क्रॅपिंग सुविधा तयार करण्यात येत असून वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, गॅरेजेस, फेरीवाले यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही कदम यांनी संबंधित अधिकारी यांना यावेळी दिल्या.

मुंबईच्या तसेच मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तक्षशीला, आरे, दुर्गानगर, जोगेश्वरी व अंधेरी गुंफा, सात बंगला, कुरार आदी ज्या ज्या भागात ड्रग्ज विक्री केली जाते त्या सर्व ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावेत. विविध ठिकाणांवरील, सिग्नलवरील भिकारी व तृतीयपंथी यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, श्याम नगर येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या पोलीस बीट चौकीचा म्हणावा तसा वापर करण्यात येत नसल्याने, या बीट चौकीवरील खोली महिला सक्षमीकरणासाठी वापरण्यात यावी, अशा मागण्याही वायकर यांनी या बैठकीत केल्या.

जोगेश्वरी-आरे भुयारी मार्गाला परवानगी द्या!

जोगेश्वरी व आरे भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, गोरेगाव-(पूर्व) नेस्को सेंटर येथे प्रदर्शनावेळी येथे येणाऱ्या गाड्या रस्त्यावर उभ्या ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनधिकृत बार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in