सीएसएमटी रेल्वे स्टेशन- मेट्रो स्टेशन जोडण्याचा प्रस्ताव

मुंबई मेट्रो-३ ही दक्षिण मुंबई व प. उपनगरांमध्ये प्रवासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. विशेषत: पश्चिम रेल्वेवरील ताण कमी होईल. हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सीएसएमटी रेल्वे स्टेशन- मेट्रो स्टेशन जोडण्याचा प्रस्ताव

मुंबई : मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो-३ सुरू झाल्यानंतर त्यातून येणारा प्रवाशांचा लोंढा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी) येणार आहे. तसेच सीएसएमटीतून प्रवाशांचा लोंढा मेट्रो-३ वर येईल. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्टेशन-मेट्रो-३ चे स्टेशन जोडण्याच्या प्रस्तावावर रेल्वे व राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे.

सूत्रांनी सांगितले की, मेट्रोचे स्थानक व सीएसएमटी स्थानक जोडण्यासाठी काही पर्यायांवर विचारमंथन सुरू आहे. सध्या मुंबई मनपाचा भुयारी मार्ग आहे. तोच पुढे मेट्रो-३ ला जोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, मेट्रो सेवा सुरू झाल्यावर प्रचंड गर्दी झाल्यास काय करायचे? यावर विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे सीएसएमटी मेट्रो स्टेशन ते सीएसएमटी स्टेशनच्या फलाट क्रमांक एकपर्यंत नवीन भुयारी मार्ग बांधणे प्रस्तावित आहे. हा मार्ग हिमालय ब्रीजच्या जवळ असेल. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने हा प्रस्ताव रेल्वेला सादर केला. नवीन पर्याय अधिक व्यवहार्य ठरू शकतो. नवीन भुयारी मार्ग बांधल्यास प्रवाशांची गर्दी होणार नाही. तसेच त्यांना मेट्रो ते रेल्वेचा प्रवास बदलताना अडचणी येणार नाहीत. कारण सध्याचा मुंबई मनपाचा भुयारी मार्ग अधिक गर्दीचा आहे. त्यामुळे रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, राज्य सरकार व रेल्वेचे अधिकारी अधिक व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो-३ ही दक्षिण मुंबई व प. उपनगरांमध्ये प्रवासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. विशेषत: पश्चिम रेल्वेवरील ताण कमी होईल. हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in