‘वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा’; रंगारी बदक चाळीचा अनोखा संदेश

श्री स्वामी समर्थांनी ज्या वटवृक्षाखाली साधना-आराधना केली, त्याचे स्थानमहात्म्य लक्षात घेता ‘वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा’ असा पर्यावरणपूरक संदेश ‘रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने दिला असून मंडळाचे यंदाचे ८५ वे वर्ष आहे.
‘वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा’; रंगारी बदक चाळीचा अनोखा संदेश
Published on

गिरीश चित्रे / मुंबई

श्री स्वामी समर्थांनी ज्या वटवृक्षाखाली साधना-आराधना केली, त्याचे स्थानमहात्म्य लक्षात घेता ‘वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा’ असा पर्यावरणपूरक संदेश ‘रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने दिला असून मंडळाचे यंदाचे ८५ वे वर्ष आहे.

स्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामी सूत यांनी सांगितलेल्या स्वामी समर्थांच्या बाल स्वरूपाच्या प्रकट दिनाचे कथानक रंगारी बदक चाळीच्या पारंपरिक देखाव्यातून साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वडाच्या झाडाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. जगभरात वाढत्या प्रदूषणाने तापमानवाढ होऊन पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्राणवायू देणाऱ्या झाडांचीही सर्रास कत्तल केली जात आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सजीवसृष्टीला आवश्यक असलेला प्राणवायू वातावरणात सोडण्याचे कार्य बजावणाऱ्या वटवृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या बहुगुणी झाडावर नानाविध पशू-पक्ष्यांचाही अधिवास असतो. वडाचे आयुष्य हजारो वर्षे असते. वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करतो. त्याच्यापासून आसपासच्या लोकांना शुद्ध प्राणवायू मिळतो. एक पूर्ण विकसित वडाचे झाड तासाला ७१२ किलो प्राणवायू वातावरणात सोडते. अलीकडच्या काळात विदेशी झाडे लावण्याचे फॅड वाढत असल्याने वड-पिंपळासारखी वर्षानुवर्षे जगणारी झाडेच दुर्मीळ होत चालली आहेत. त्यामुळे वड वाचविण्याचा पर्यावरणस्नेही संदेश देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘स्वामी वृक्ष’ ही संकल्पना साकारली आहे. त्यामागे वटवृक्षांचे जतन व संवर्धन करण्यात यावे हीच अपेक्षा असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. एकेकाळी काही सिद्धपुरुष होऊन गेले, त्यांनी आपल्या वाणीतून आणि आचरणातून सकारात्मक बदल घडवला, त्यातीलच एक नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी आपल्या जीवन प्रवासात न्याय व्यवस्था, अन्नदान आणि भूतदया म्हणजेच आपण प्राण्यांवर का प्रेम केले पाहिजे? शेवटी निसर्ग हाच आपला गुरू आहे, निसर्गावर प्रेम करा, निसर्गातील रूढीपरंपरा यावर प्रेम करा, लहान बालकांना प्रोत्साहन द्या, अशा प्रकारच्या गोष्टी रूढ करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ८४ वर्षांत मंडळाने हिंदूंच्या पवित्र धर्मग्रंथ रामायण, महाभारत, विष्णुपुराण यातील कथानके तसेच उत्तम देखावे सादर करून समाजप्रबोधन, जनजागृतीचे कार्य केले आहे. यावर्षी 'श्री स्वामी समर्थ साक्षात्कार' हे कथानक साकारण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव!

यावर्षी स्वामी हा विषय घेऊन आम्ही आमचा मुख्य प्रवेशद्वार बांबू आणि पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून तयार केला आहे. लालबागमध्ये प्रथमच पर्यावरणपूरक आणि भव्यदिव्य असा मुख्य प्रवेशद्वार आणि देखावा पाहायला मिळतोय. लाडका लंबोदराचं सुंदर आणि आगळेवेगळे रूप मूर्तिकार दिनेश सारंग यांनी घडवलं आहे. विविध सामाजिक उपक्रमातून आम्ही स्वामींबद्दलचे महत्त्व सांगत, त्यांनी रूढ केलेल्या मूल्याबद्दल आम्ही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी दिली.

‘वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा’; रंगारी बदक चाळीचा अनोखा संदेश
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

गरजूंना मदतीचा हात

रंगारी बदक चाळीच्या मंडळामार्फत वर्षभरात विविध आरोग्य शिबीर, चश्मा शिबिराचे आयोजन केले जात आहे. सर्व राष्ट्रीय सण उत्साहात साजरे केले जात आहेत. सणासुदीच्या दिवसांत आदिवासी पाड्यातील गरजू लोकांना दिवाळी फराळ, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in