
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुजोर कारभारामुळे त्रस्त झालेल्या कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कामगारांनी आंदोलनाचा बडगा उगारला. या आंदोलनादरम्यान कामगारांनी प्रशासकीय अधिकारी विद्या लोकेगावकर यांची जो[पर्यंत बदली होत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यांच्यावर अरेरावी करून त्यांच्या कुटुंबीयांना बोल लावतात. याच्याच निषेधार्थ सोमवारी कामगारांनी ठिय्या आंदोलन पुकारले. प्रशासकीय अधिकारी विद्या लोकेगावकर यांच्या मानसिक त्रासामुळे सर्व संवर्गातील कर्मचारी त्रस्त झाले आहे.
लोकेगावकर सर्वांसमोर कर्मचाऱ्यांना फटकारतात. त्यांना अपशब्द उच्चारतात, असा आरोप युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ आस्थापना विभागातील कर्मचारी आणि शिपाई यांच्या प्रलंबित एएनएम असल्यामुळे कामगारांशी कोणतीही चर्चा न करता त्यांच्या अर्जित रजा जमा असताना देखील सॅप प्रणालीत जाणूनबुजून एलडब्ल्यूपी टाकल्या आहेत. त्यामुळे लोकेगावकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. यासंदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक नम्रता कौर यांनी आपण चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले. तसेच कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन यावेळी केले.
कर्मचाऱ्यांच्या उलट्या बोंबा
मी महानगरपालिकेच्या नियमानुसार काम करते आहे. या विभागातील एक कर्मचारी पाच वर्षांपूर्वी निधन पावला आहे. त्याची देय रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा त्रास आहे, मात्र त्याला सुद्धा अद्याप या कर्मचाऱ्यांनी दाद लागू दिलेली नाही. दहा ते पंधरा वर्षांच्या केसेस प्रलंबित आहेत. ही कामे करण्यासाठी सांगितली तर कर्मचारी आणि शिपाई उद्धटपणे वागतात. त्यांना कामासाठी बोलले तर ते मोठ्या आवाजात बोलतात. प्रशासकीय अधिकारी म्हणून मला जे अधिकार आहे त्यानुसारच मी त्यांच्याशी वागते. काम न करता केवळ हुल्लडबाजी करतात. त्यांना काम करण्यास सांगितले तर ते ऐकत नाही.
- विद्या लोकेगावकर, प्रशासकीय अधिकारी