पाण्यासाठी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
पाण्यासाठी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरण ओव्हरफ्लो झाले. तरीही पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व, विलेपार्ले परिसरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होतो. पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बुधवारी भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, याप्रश्नी आयुक्तांना निवेदन दिले असता, ज्या भागात पाणी कमी येते, त्या भागात पाहणी करून प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरण ९९ टक्के ओव्हरफ्लो झाले आहेत. तरीही अनेक भागात कमी पाणीपुरवठा होतो. विलेपार्ले-अंधेरी वॉर्ड ८४ येथील कोलडोंगरी, पोदार वाडी, जीवन विकास केंद्र परिसर, जम्बो दर्शन परिसर, विजयनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर या विभागात कित्येक महिने ५० टक्केच पाणीपुरवठा होत आहे. अनेक सोसायट्या टँकरने आपली रोजची पाण्याची गरज भागवत आहेत. पालिकेने १० टक्के कपात रद्द करूनही या आणि इतर विभागातील पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. जलविभागाच्या स्तरावर चर्चा, सूचना करण्यात आल्या. मागील महिन्यात आंदोलनाचा इशारा दिल्यावर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला. नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती आहे, याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे सामंत म्हणाले.

अडथळ्यांची तपासणी करणार -आयुक्त

वेरावली जलाशयातून अंधेरी, विलेपार्ल्यात पाणी वितरण केले जाते. या जलाशयात पाणी साठवण तसेच वितरण योग्य प्रकारे होत नसल्याने पाणीपुरवठा अपुरा होत असल्याची शक्यता आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली. ज्या भागात पाणी कमी येते तेथील जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक दोष आहेत का, तसेच वेरावली जलाशयातून होणाऱ्या पाणी वितरणात अडथळे आहेत का याची पाहणी, तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in