
मुंबई : मुंबईत आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. मुंबईतील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने राखीव पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी मंगळवारी सभागृहात केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागण्या वरील चर्चेत ते बोलत होते.
प्रभू म्हणाले की, मोडक सागर, मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र फेब्रुवारीपासून उन्हाचा तडाखा वाढला असून बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत हळुवार घट होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात जूनमध्ये वेळेवर पावसाचे आगमन होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
मुंबईची मदार ‘राखीव कोट्या’वर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात धरणांतील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. वातावरणीय बदलामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे मुंबईची पाण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने भातसा धरणातील १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातील ६८ हजार दशलक्ष लिटर पाणी असे एकूण १ लाख ७१ हजार दशलक्ष लिटर पाणी राखीव साठ्यातून उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी सभागृहात केली.