बाप्पाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळे तयार;५०३ मंडळांना मंडपाची परवानगी

यंदा कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी लगबग सुरू झाली आहे
 बाप्पाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळे तयार;५०३ मंडळांना मंडपाची परवानगी

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, तर मंडपासाठी आतापर्यंत १,२४९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १०२ मंडळांच्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने फेटाळण्यात आले आहेत. तर ५०३ मंडळांना मंडपाची परवानगी देण्यात आल्याची माहिती पालिकेचे गणेशोत्सव समन्वय हर्षद काळे यांनी दिली.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि गेली दोन वर्षे सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते; मात्र यंदा कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी लगबग सुरू झाली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याबरोबर गणेश मंडळेही सज्ज झाली आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही मोठ्या मंडळांकडून गणेशोत्सवाआधी काही दिवस गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी नियमानुसार मंडपासाठी मंडळांना परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार मंडप उभारण्यासाठी पालिकेकडे गणेशोत्सव मंडळांकडून परवानग्यांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेकडे मंगळवारपर्यंत १,२४९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ५०३ अर्जांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. तर ५०६ अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. १३८ दुबार अर्ज आले आहेत. तर अपुऱ्या कागदपत्रांमुळे १०२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत; मात्र कागदपत्रांची पूर्तता केल्यास या मंडळांनाही परवानगी मिळेल, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in