केईएमवर जनआक्रोश! औषधांचा तुटवडा, सिटीस्कॅन, एमआरआयसाठी वेटींग यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची धडक

केईएम रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची सातत्याने गैरसोय होत आहे.
केईएमवर जनआक्रोश! औषधांचा तुटवडा, सिटीस्कॅन, एमआरआयसाठी वेटींग यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची धडक

मुंबई : औषधांचा तुटवड्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावे लागणे, सिटीस्कॅन, एमआरआय, शस्त्रक्रियेसाठी महिनोनमहिने वेटींग अशा विविध गैरसोयींमुळे केईएम रुग्णालयात रुग्णांची परवड होते. केईएम रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने मंगळवारी धडक मोर्चा काढत रुग्णालयाला जाब विचारण्यात आला. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुढील दोन महिन्यांत या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले.

केईएम रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची सातत्याने गैरसोय होत आहे. याच मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गैरसोयी दूर करण्यासाठी ४ जुलै रोजी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांबरोबर बैठक पार पडली. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा बैठक पार पडली. मात्र दोन्ही बैठकीत आश्वासन देऊनही पूर्तता न झाल्याने मंगळवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केईएम रुग्णालयावर मोर्चा काढला. यावेळी आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू (दादा) सकपाळ, माजी नगरसेविका श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

‘केईएम’मधील गैरसोयी

गोरगरीब रुग्णांना आवश्यक औषधे बाहेरून आणावी लागतात

एमआयआर, सिटीस्कॅन, सोनोग्राफी मशीनचे टेंडरच निघाले नसल्याने तुटवडा

सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण

स्ट्रेचर, व्हिलचेअरची उपलब्ध संख्या आवश्यकतेपेक्षा निम्मीच उपलब्ध

दुरुस्तीसाठी सहा वॉर्ड चार महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय

भुलतज्ज्ञांची कमतरता तसेच रक्ताची चाचणी, सोनोग्राफीसाठी आठ तासांची रखडपट्टी

डीनना ४० हजारांपर्यंतची औषधे करण्याच्या मर्यादेमुळे औषधांची कमतरता

अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली

केईएम रुग्णालयातील गैरसोयी, रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारखा देणे एकूणच केईएम रुग्णालयातील गैरसोयीचा पाढा वाचत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी लवकरच योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

केईएम रुग्णालयाला छावणीचे स्वरूप

ठाकरेंच्या शिवसेनेने मंगळवारी केईएम रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी केईएम रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे केईएम रुग्णालयात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in