

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या पुणेहून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम आणि मॉकड्रील करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल, तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे.
कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक विना व्यत्यय सुरू राहण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ प्रयत्नशील आहे. त्यानुसार पुण्याहून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम आणि मॉकड्रील करण्यात येणार आहे.
वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा...
या कालावधीत सर्व वाहने जुन्या मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. तर कनेक्टिंग लिंकवरुन मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे. तीन तास एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याने कनेक्टिंग लिंक मार्गिकेवरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन एमएसआरडीसी प्रशासनाने केले आहे. दुरूस्ती कामाच्या वेळेत मार्गिकेवरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.