मुंबई हवाई कार्गोत खंडणीचे रॅकेट वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्यांनीच नेमले ‘पंटर’

अतिरिक्त कस्टम आयुक्त (आयात विभाग) देवींदर राणा व कस्टम ॲॅपरायझर ग्यान प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही
मुंबई हवाई कार्गोत खंडणीचे रॅकेट वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्यांनीच नेमले ‘पंटर’

मुंबई : मुंबई हवाई कार्गोत काही वरिष्ठ कस्टम अधिकारी आयातदार व कस्टम हाऊस क्लिअरिंग एजंटकडून (सीएचए) ग्राहकोपयोगी वस्तूंवर आपल्या पंटरच्या मार्फत खंडणी घेत असल्याचे उघडकीस आले आहे. मोबाईल, तयार कपडे, कॉस्मेटिक, औषधे, रसायने आदींवर दर आठवड्याला प्रति किलो ५ रुपये याप्रमाणे ही खंडणी गोळा केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

काही आयातदारांच्या डायरीतील नोंदी व रेकार्ड ‘नवशक्ति’च्या हाती लागले आहेत. यात पाच वरिष्ठ अधिकारी आयात केलेल्या वस्तू प्रति किलो पाच रुपये दराने खंडणी मागत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई हवाई कार्गोत दर महिन्याला ३०० मेट्रिक टनाच्या वस्तू आयात केल्या जातात. दरमहा भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी यातून १५ लाख, तर ‘ब’ वर्गातील अधिकारी ८ ते १० लाख रुपये घरी नेतात. मोबाईलची उपकरणे आणणाऱ्या आयातदारांना या वस्तूंची सोडवणूक करण्यासाठी लाच द्यावीच लागते. ती न दिल्यास त्यांचा माल विविध कारणांनी अडवून धरला जातो.

‘नवशक्ति’च्या हाती लागलेल्या या कागदपत्रात गुप्तचर व तपास खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई हवाई कार्गोचे कस्टम आयुक्त (सर्वसाधारण) नीलंक कुमार हे सीबीआयचे माजी प्रमुख अनिल कुमार सिन्हा यांचे मेहुणे आहेत. महिनाभर शोधमोहीम राबवल्यानंतर ‘नवशक्ति’च्या हाती हे रॅकेट लागले आहे. कार्गो संकुलात खासगी व्यक्तींचा वावर मुक्तपणे होत असून त्यांना ‘एसएम’ असे संबोधले जाते. हा भाग अत्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आयातदारांना पैशासाठी धमकावणाऱ्या लॉजिस्टिक कंपनीच्या नावाने जारी केलेला प्रवेश पास वापरून उच्च सीमाशुल्क अधिकाऱ्यांना भेटले जाते. काही आयातदारांनी ही खंडणी देण्यास विरोध केला तर त्यांना किलोमागे १० रुपयांची खंडणी मागितली जाते.

एका ‘एसएम’ने सांगितले की, कस्टम अधिकाऱ्यांसाठी पैसे वसूल करायला मला वेळ नसतो. माझा स्वत:चा लॉजिस्टीकचा व्यवसाय आहे. मुंबई हवाई कार्गो संकुलात चालणाऱ्या या खंडणीच्या रॅकेटशी माझा काहीही संबंध नाही. दर आठवड्याला प्रति किलो १० रुपये खंडणी न दिल्यास आयात केलेला माल परत पाठवण्याची धमकी कस्टमच्या ॲप्रायझरकडून दिली जाते, असा आरोप ‘एसएम’ने केला.

कस्टम अधिकाऱ्याने आरोप फेटाळले

हवाई कार्गो कस्टम आयुक्त निलंक कुमार (सर्वसाधारण) यांनी कस्टम क्लिअरिंग एजंटचा छळ होत असल्याचे आरोप फेटाळले आहेत. कोणाचा छळ होत असल्यास माझे कार्यालय सहन करणार नाही. भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाते. सीएचए व आयातदारांनी केलेल्या तक्रारींवर यापूर्वीच चौकशी सुरू केली आहे. गरज पडल्यास योग्य कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तर कस्टम आयुक्त (आयात) शिरील सरोज यांनी आयातदारांच्या छळ प्रकरणाच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे मान्य केले. कस्टम्स गुप्तचर विभागात नियुक्त झालेल्या कस्टम्स अॅपसेझरची खंडणी रॅकेटचे नेतृत्व केल्याबद्दल बदली केली होती. परंतु, तक्रारीत नाव असलेल्या वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्यांना अपुरा पुरावा दिल्याचे कारण सांगून वाचवण्यात आले.

एका आयातदाराने आरोप केला की, प्रतिबंधित रसायनावर मोठे कस्टम शुल्क आकारले जाते. ते औषध कंपनीसाठी वापरले जाते. मात्र, ते जाणूनबुजून प्रयोगशाळा रसायन म्हणून जाहीर केले. त्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाची परवानगी नसताना ते कस्टम अधिकाऱ्यांनी नेऊ दिले. त्यातून दरमहा सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

वित्त मंत्रालयाचे कारवाईचे आदेश

अतिरिक्त कस्टम आयुक्त (आयात विभाग) देवींदर राणा व कस्टम ॲॅपरायझर ग्यान प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. सीएचए व आयातदारांची छळवणूक करणाऱ्या भ्रष्टाचारी सीमाशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश वित्त मंत्रालयाच्या निर्देशांनंतर देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in