मराठी पाट्या लावा ;व्यापारी असोसिएशनची दुकानदारांना सूचना

मुंबईत सात लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत. सात लाख दुकाने व आस्थापनांना दुकानाच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा पद्धतीने लावणे बंधनकारक आहे.
मराठी पाट्या लावा ;व्यापारी असोसिएशनची दुकानदारांना सूचना

मुंबई : मराठी पाट्या लावण्यासाठी दुकाने व आस्थापनांकडे फक्त एक दिवस शिल्लक आहे. दुकानाच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा पद्धतीने मराठी पाटी नसल्यास पालिका दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावा, अशा सूचना मुंबईतील दुकाने व आस्थापनांना केल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी सांगितले.

मुंबईत सात लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत. सात लाख दुकाने व आस्थापनांना दुकानाच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा पद्धतीने लावणे बंधनकारक आहे. मात्र मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. पालिकेच्या कारवाई विरोधात व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; मात्र सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी असोसिएशनची याचिका २५ सप्टेंबर रोजी फेटाळली. तसेच पुढील दोन महिन्यांत म्हणजे २५ नोव्हेंबरपर्यंत मराठी पाट्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिली. शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी ही मुदत संपुष्टात आली, परंतु २५, २६ व २७ नोव्हेंबर रोजी सुट्ट्या आल्याने मंगळवारपासून कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ज्या दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाटी नसेल त्याच्यावर प्रती कामगार दोन हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी मुदतवाढ दिली होती. २५ नोव्हेंबर रोजी मुदत संपुष्टात आली असून, प्रत्येकाने मराठी पाटी ठळकपणे दिसेल अशी प्रवेशद्वारावरावर लावावी, असे आवाहन केल्याचे शहा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in