प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही दर्जेदार सुविधा! एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची माहिती

राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या माध्यमातून पार पाडली जाते.
प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही दर्जेदार सुविधा! एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची माहिती
Published on

गिरीश चित्रे/ मुंबई: वेळेत बस उपलब्ध होणे, स्वच्छ विश्रांतीगृह अशा प्रकारच्या दर्जेदार सुविधा प्रवाशांना उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. एसटी महामंडळासाठी प्रवासी जितका महत्त्वपूर्ण तितकाच एसटीचा कर्मचारी. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेचे योग्य नियोजन करणे, विश्रामगृह उपलब्ध करत स्वच्छता राखणे एकूणच प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास एसटी महामंडळाच्या संचालक (एमडी) डॉ. माधव कुसेकर यांनी दैनिक 'नवशक्ति' बोलताना व्यक्त केला.

राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या माध्यमातून पार पाडली जाते. एसटीच्या ताफ्यात १४ हजार गाड्या असून रोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांनी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ बस उपलब्ध करणे, राज्यातील प्रत्येक बस आगारात स्वच्छता ठेवणे, शौचालयांची नियमित स्वच्छता या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही कुसेकर यांनी सांगितले.

एसटीच्या ताफ्यात १४ हजार गाड्या असून तब्बल ३४ हजार चालक व वाहक आहेत. एसटीसाठी प्रवासी जितका महत्त्वपूर्ण तितकाच एसटीचा कर्मचारी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समस्या जाणून घेत त्या सोडवणे, रेस्ट रूम उपलब्ध करून देणे आणि त्याठिकाणी स्वच्छता राखणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेचे नियोजन करणे, कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर आपण त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करणे योग्य ठरेल. त्यामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही दर्जेदार सुविधा उपलब्ध करणे या गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचे डॉ. कुसेकर यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या बस आगारात मोकळ्या जागेत सहकारी संस्था, महिला बचत गट आदींना भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि एसटीला महसूल प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.

असा आहे एसटीचा ताफा

एसटीचे बस आगार - २५०

राज्यात एसटी बस स्थानके - ५६०

एसटी गाड्या - १४ हजार

इलेक्ट्रिक गाड्या - ६०

रोजचे प्रवासी - ५५ लाख

logo
marathi.freepressjournal.in