रेबीजमुक्त मुंबई अभियान: पाच दिवसांत १२ हजार भटक्या कुत्र्यांना पल्स अँटी रेबीजची मात्रा

१० विभागात मोहीम पूर्ण, २६ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांच्या मोहिमेत तब्बल १५ हजारपैकी १२ हजार भटक्या कुत्र्यांचे पल्स अँटी रेबीज लसीकरण
रेबीजमुक्त मुंबई अभियान: पाच दिवसांत १२ हजार भटक्या कुत्र्यांना पल्स अँटी रेबीजची मात्रा
Published on

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर जीवघेण्या रोगापासून मानवाचा बचाव करण्यासाठी पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांच्या मोहिमेत तब्बल १५ हजारपैकी १२ हजार भटक्या कुत्र्यांचे पल्स अँटी रेबीज लसीकरण करण्यात आल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले. दरम्यान, रेबीज आजार जीवघेणा असून, या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. पुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अँटी रेबीज लसीकरण मोहीम हा आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सन २०३० पर्यंत श्वानांपासून भारताला रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. पालिकेने २०२२ मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला. रेबीज निर्मूलनासाठी पालिकेने २५ जुलै २०२३ रोजी वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार केला. याच पार्श्वभूमीवर आता वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज यांच्यासोबत मिळून पालिका क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई व पनवेलच्या हद्दीला लागून असलेल्या भागातील भटक्या कुत्र्यांचे पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याचे डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

शाळा, कॉलेज, बांधकाम ठिकाणी जनजागृती

रेबीज मुक्त मुंबईसाठी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. याचबरोबर रेबीज आजार जीवघेणा असून, याबाबत शाळा, कॉलेज, बांधकाम ठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

एज्युकेशन ऑफ रेबीज इंग्लंडची टीम कार्यरत

भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यासह लोकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यासाठी पशुवैद्यकीय टीमबरोबर रेबीज एज्युकेशन ऑफ इंग्लंडची टीम कार्यरत आहे.

१० विभागात मोहीम पूर्ण!

दरम्यान, रोज सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान के (पूर्व), के (पश्चिम), एच (पूर्व), एच (पश्चिम), एल, एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, जी (उत्तर) आणि एफ (उत्तर) या १० प्रशासकीय विभागांमधील सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले.

पशुवैद्यक, वैद्यकीय परिचारिकांची टीम!

या मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक, श्वान पकडणारे चमू, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, वायओडीए, आयडीए, डब्ल्यूएसडी या स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, स्थानिक फीडर्स आणि स्वयंसेवकही सहभागी होतील. प्रत्येक चमूमध्ये व्हॅक्सिनेटर (पशुवैद्यक/पशुवैद्यकीय परिचारिका), हँडलर (प्रशिक्षित पशुवैद्य सहाय्यक), नेट कॅचर आणि डेटा कलेक्टर यांचा समावेश असेल.

logo
marathi.freepressjournal.in