मुंबई : भटकी कुत्री व पाळीव प्राण्यांच्या दंशानंतर रेबीज आजार प्राणघातक ठरु शकतो. रेबीज प्रतिबंधक लस सध्या पालिकेच्या दवाखान्यात पहिल्या सत्रात सकाळी ९ ते ४ या वेळेत उपलब्ध होती. परंतु आता पालिकेच्या काही निवडक दवाखान्यात दुसऱ्या सत्रात म्हणजे सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत उपलब्ध केली आहे. यासाठी पालिकेच्या ३०० हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे.
जागतिक रेबिज दिन दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. रेबीज प्रादुर्भाव व उपाययोजना याबाबत जनजागृती देखील करण्यात येते. यंदाच्या जागतिक रेबिज दिन निमित्ताने महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे ३०० हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना रेबिज आजाराच्या नियंत्रणासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत रेबिज लसीकरण करण्यात येते. त्यापुढे जावून महानगरपालिकेने आता निर्णय घेतला आहे की, प्रारंभी निवडक दवाखान्यांमध्ये सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत या दुसऱ्या सत्रात देखील रुग्णांना रेबीज लस विनामूल्य देण्यात येईल. यामुळे रेबीज रोखण्यासाठी मदत होईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह म्हणाल्या.