मानहानीच्या प्रकरणांनी गाजला दिवस; राहुल गांधी भिवंडी कोर्टात, संजय राऊत मालेगावात अरविंद सावंतही माझगाव न्यायालयात

राजकीय घडामोडींनी आणि मानहानीच्या खटल्यांमुळे शनिवारचा दिवस विशेष गाजला. एका बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात हजर झाले, तर दुसरीकडे मालेगावात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील अब्रुनुकसानीचा वाद मिटला...
मानहानीच्या प्रकरणांनी गाजला दिवस; राहुल गांधी भिवंडी कोर्टात, संजय राऊत मालेगावात अरविंद सावंतही माझगाव न्यायालयात
Published on

मुंबई : राजकीय घडामोडींनी आणि मानहानीच्या खटल्यांमुळे शनिवारचा दिवस विशेष गाजला. एका बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात हजर झाले, तर दुसरीकडे मालेगावात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील अब्रुनुकसानीचा वाद मिटला. त्याचवेळी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून माझगाव न्यायालयात शायना एन. सी. यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात या तिन्ही प्रकरणांची जोरदार चर्चा रंगली.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीदरम्यान भिवंडीतील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी सभेत 'आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली', असे विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांचे जामीनदार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. मात्र डिसेंबर २०२५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर न्यायालयाने नवीन जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिवंडी न्यायालयात न्यायाधीश पी.एम. कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी सकाळी उपस्थित झाले. यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे हे देखील न्यायालयात उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी न्यायालयात राहुल गांधी यांचा जामीन स्वीकारला. न्यायालयाने जामीनपत्र मंजूर केल्याने पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अॅड. नारायण अय्यर यांनी दिली.

कुणालाही न भेटताच राहुल गांधी निघाले

राहुल गांधी भिवंडी न्यायालयात येणार असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गांधी यांना भेटण्यासाठी न्यायालयात व परिसरात हजर होते. मात्र राहुल गांधी कुणालाही न भेटता भिवंडी न्यायालयातून निघून गेले. राहुल गांधी यांच्या प्रकरणाची सुनावणी शनिवारी पावणे अकरा वाजता होती. मात्र ते १५ मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते. राहुल गांधी नेहमीच न्यायालयाचा आदर करतात, त्यामुळे ते पंधरा मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते. राहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुलुंड टोल नाका येथे भाजपने दाखविले काळे झेंडे

मुलुंड टोल नाका परिसरात राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने थोडा तणाव निर्माण झाला होता. 'हे कृत्य अत्यंत निंदनीय असून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना काळे झेंडे दाखवणे चुकीचे आहे. याठिकाणी काही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. त्यामुळे सरकारचा व पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी दिली. त्यांच्या सोबत उपमहापौर तारिक मोमीन आणि भिवंडी शहर उपाध्यक्ष जावेद फारुकी यांनी देखील या घटनेचा निषेध केला. काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून भाजपविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

मालेगावात राऊत-भूसेंची दिलजमाई

दरम्यान, मालेगाव न्यायालयात मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला. दोन्ही नेते न्यायालयात एकत्र पोहोचल्याचे दृश्य खास चर्चेचा विषय बनले. गैरसमजामुळे हा वाद निर्माण झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 'आमचे संबंध जुने आहेत. चुकीच्या माहितीवर हा वाद निर्माण झाला,' असे ते म्हणाले. दादा भुसे यांनी सांगितले की, गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींच्या कथित घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र राऊत यांनी माफी मागितल्याने हा खटला मागे घेतला असे त्यांनी स्पष्ट केले.

अरविंद सावंत सावंत-शायना एन सी प्रकरणाची सुनावणी

मुंबईत विधानसभा निवडणुकीदरम्यान अरविंद सावंत यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्याबाबत 'इंपोर्टेड माल' असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाल्याचा दावा करत शायना एन.सी. यांनी सावंत यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानी आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी शनिवारी झाली असून शायना एनसी यांची साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणी पुढील सुनावणी १६ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, एकाच दिवशी राज्यातील तीन वेगवेगळ्या न्यायालयांत प्रमुख राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि मानहानीच्या प्रकरणांवर झालेली घडामोड यामुळे हा शनिवार राजकीयदृष्ट्या गाजला.

logo
marathi.freepressjournal.in