
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित विधानांवरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
याचिकेत राहुल गांधी यांना न्यायालयाने सावरकरांबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी याचिकेची प्रत वाचण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका ‘अभिनव भारत काँग्रेस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडणीस यांनी दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते की, राहुल गांधी यांच्या विधानांमुळे स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे आणि संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याच्या त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे.
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने “राहुल गांधी यांना कोणतीही याचिका वाचण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. एखाद्या नेत्याची विचारसरणी बदलण्यासाठी न्यायालय कोणताही बंधनकारक आदेश देऊ शकत नाही.” असे म्हणत ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्ते पंकज फडणीस यांना फटकारले.