Mumbai : रस्ते कामासाठी डेडलाईन; राहुल नार्वेकर यांचे पालिकेला निर्देश

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. आता ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा एकदा रस्त्यांची कामे हाती घेण्यात यावीत. मात्र ही कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले.
Mumbai : रस्ते कामासाठी डेडलाईन; राहुल नार्वेकर यांचे पालिकेला निर्देश
Photo : X (@RahulN_Office)
Published on

मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. आता ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा एकदा रस्त्यांची कामे हाती घेण्यात यावीत. मात्र ही कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले. तसेच यापुढे लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय रस्त्यात खोदकाम केले जाणार नाही, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच रस्ते कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटीची नियुक्ती करा, अशी सूचना मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केली.

शहरातील रस्ते विकास जलदगतीने करण्याच्या उद्देशाने राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधान भवनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, पराग शहा, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते मॅस्टिक डांबर वापरून बांधले जातील. हा प्रस्ताव त्यांनी मार्चमध्ये झालेल्या आढावा बैठकीत दिला होता. ही सूचना आता मान्य करून पालिकेला तसे निर्देश दिले आहेत, असे आमदार अमित साटम म्हणाले.

मुंबईचे पदपथ यापुढे पेव्हर ब्लॉक वापरून बांधले जाणार नाहीत, तर टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी स्टॅम्प केलेले काँक्रीट वापरण्यात येईल, असे साटम यांनी सांगितले. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांबद्दलच्या सर्व तक्रारी तांत्रिक मूल्यांकनासाठी आयआयटीकडे पाठवण्याचे आणि त्यांच्या सूचनेनुसार दुरुस्त करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.

झोननिहाय डॅशबोर्ड !

आतापर्यंत एकूण रस्त्यांच्या कामापैकी ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. रस्ते विकासाच्या प्रगतीचा मागोवा लोकांना घेता यावा यासाठी झोननिहाय डॅशबोर्ड तयार करण्यात येईल, असेही आमदार साटम यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in