मुंबई : फटाके फुटायला अजून वेळ आहे, असे सूचक वक्तव्य विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. जनता आणि कायद्याला अपेक्षित असा निर्णय आपण देऊ, असेही ते म्हणाले.
भाजपच्या वतीने कुलाबा येथे आयोजित पालावरची दिवाळी कार्यक्रमाला राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणे अपेक्षित आहे. कायदा, संविधानात ज्या तरतुदी असतील त्यांचे पालन करून जनता आणि कायद्याला अपेक्षित असा निर्णय आपण देऊ. असे निर्णय शाश्वत असणे आवश्यक असते. त्यामुळे निर्णय टिकून कसे राहतील याचा विचार करावा लागेल. येत्या काळात शाश्वत आणि टिकणारा निर्णय आपण देऊ. फटाके फुटायला अजून वेळ असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी ३१ डिसेंबर ही तारीख आखून दिली आहे. त्याआधी सुनावणी पूर्ण करून निर्णय जाहीर करावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांना व्हीप मिळालाच नव्हता, असा दावा करण्यात आला आहे. पुरावे, कागदपत्रे सादर करण्यास आता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुढची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागून राहिले आहे.