
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपशी युती करण्यासाठी तयार झाले होते व त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तासभर युतीविषयी चर्चाही केली होती; पण त्याचदरम्यान भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज झाले. एकाच वेळी युतीची चर्चा आणि निलंबनही कसं जमणार?” अशी खंत शिवसेना खासदार व शिंदे गटाचे संसदेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. २०१९चा शिवसेनेचा वचननामा उद्धव ठाकरेंनी बनवला होता; मात्र त्यात उल्लेख असलेल्या एकाही मुद्द्याचा महाविकास आघाडीच्या ‘समान किमान कार्यक्रमा’मध्ये समावेश नव्हता. आमदारांच्या बंडानंतर २१ जूनला शिवसेना खासदारांना वर्षावर बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी आम्ही सांगितले की, एनडीएसोबत युती करा, त्यावर ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी तुमची भूमिका आनंदाने स्वीकारेन’, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला.
“२०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसोबत युती आवश्यक आहे, असा आम्हा शिवसेना खासदारांचा आग्रह होता; मात्र उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा सूर कायम ठेवला. आम्ही विरोध करत त्यांना आपापल्या मतदारसंघातील वस्तुस्थिती सांगितली; मात्र त्यांनी सहकार्य केले नाही,” असे राहुल शेवाळे म्हणाले.
मलाही युती करायची होती, असे ठाकरे म्हणाले होते
“मलाही युती करायची होती, असे उद्धव ठाकरे आम्हाला काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशीही उद्धव ठाकरेंची चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेंनी सांगितले की, भाजपशी युती करण्याचा मीदेखील प्रयत्न करतोय, तुम्ही तुमच्या सोर्सने प्रयत्न करा, प्रयत्न सुरू ठेवा. आमचे सोर्स एकनाथ शिंदे आहेत, म्हणून उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार आम्ही प्रयत्न सुरू केला होता.
दुसरीकडे, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला, त्यामुळे आम्ही युतीबाबत प्रयत्न करत असतानाच यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यात आला. अल्वा काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी असताना त्यांनी शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ठाकरेंच्या या निर्णयाने आम्ही नाराज झालो,” असेही राहुल शेवाळे यांनी सांगितले.
शिवसेना अद्याप एनडीएतच!
“आम्ही वेळोवेळी एनडीएसोबत राहण्याची विनंती करत होतो; मात्र उद्धव ठाकरेंकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
संजय राऊतांकडून मविआचा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू होता. अरविंद सावंत यांनी राजीनामा देताना फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, एनडीएचे समर्थन काढले, असे कोणतेही पत्र दिलेले नव्हते, त्यामुळे यापूर्वी एनडीएला पाठिंब्याचे जुने पत्र आहे, ते कायम राहील, इथून पुढे आमचे समर्थन एनडीएला असेल,” असे राहुल शेवाळेंनी यावेळी स्पष्ट केले.
बंडखोर १२ खासदारांना केंद्राची वाय सुरक्षा
शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कार्यालयासह घराबाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत होणाऱ्या राजकीय भूकंपाचे पडसाद राज्यात उमटू नये, यासाठी खासदारांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.
संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात देण्याची मागणी
एकनाथ शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी केली आहे. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचे सांगत गटनेतेपदावरही शिंदे गटाने दावा केला आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंसोबत उरले केवळ सहा खासदार
१) संजय जाधव - परभणी
२) राजन विचारे - ठाणे
३) गजानन कीर्तिकर - मुंबई उत्तर -पश्चिम
४) अरविंद सावंत - मुंबई मध्य
५) ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद
६) विनायक राऊत - रत्नागिर