महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राजसाहेब ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरली. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास २० वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

प्रतिनिधी/मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यामुळे अर्थातच मनसेचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना असणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण-मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे स्वत: राज ठाकरे यांचे मतदानही याच मतदारसंघात होते. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास २० वर्षांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे स्पष्ट केले. १७ मेच्या महायुतीच्या सभेत राज ठाकरे येणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर पहिल्यांदाच राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या भेटी दरम्यान आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आदी उपस्थित होते.

मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीची रणनीती, १७ मे रोजीची महायुतीची सभा याबाबत राज ठाकरे यांनी सूचना दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

राजसाहेब ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरली. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास २० वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसेच १७ मे च्या महायुतीच्या सभेत राज ठाकरे हे सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in