बनावट सौंदर्य प्रसाधन बनविणाऱ्या उत्पादकाच्या विक्री केंद्रावर धाड

बनावट सौंदर्य प्रसाधन बनविणाऱ्या उत्पादकाच्या विक्री केंद्रावर धाड
Published on

विविध जाहिरातींना भुलून लोक सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करतात. बनावट सौंदर्य प्रसाधन बनविणाऱ्या उत्पादकाच्या विक्री केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) टाकलेल्या धाडीत सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

मुंबईतील जुहू या ठिकाणी बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार जुहू येथील ग्रूमिंग एन्टरप्राईस प्रा. लिमिटेड कंपनीवर धाड टाकून तपासणी केली असता विविध सौंदर्य प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन सुरू होते. या उत्पादनांची विक्री मुंबईतील विविध ब्युटी पार्लर व सलूनला होत होती.

बनावट शाम्पू, कंडिशनर, बिअर्ड वॉश, हेअर ट्रिटमेंट व विविध केराटीनयुक्त सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करून ते ७५० ते २८ हजार रुपयांनी विकत असल्याचे आढळले. एफडीएने या कारवाईत २२.७१ लाख रुपयांची बनावट सौंदर्य प्रसाधने व ते बनवण्याकरिता लागणारी उपकरणे, रिकाम्या बाटल्या व लेबल्स आदी मुद्देमाल जप्त केला. तसेच ५ सौंदर्य प्रसाधनांचे नमुने चाचणीसाठी मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मे. ग्रूमिंग एन्टरप्राईस प्रा.लि. कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in