तिसऱ्या मुंबईत ‘रायगड-पेण ग्रोथ सेंटर’ची स्थापना; दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून ‘रायगड - पेण ग्रोथ सेंटर’ची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात केली. नवी मुंबई विमानतळापासून १५ ते २० किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे.
तिसऱ्या मुंबईत ‘रायगड-पेण ग्रोथ सेंटर’ची स्थापना; दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत  मुख्यमंत्र्यांची घोषणा
Photo : X (Devendra Fadanvis)
Published on

मुंबई : तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून ‘रायगड - पेण ग्रोथ सेंटर’ची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात केली. नवी मुंबई विमानतळापासून १५ ते २० किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. ‘रायगड-पेण ग्रोथ सेंटर’मध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून यानिमित्ताने नवीन बिझनेस डिस्ट्रीक्टची निर्मिती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय उद्योजक, कंपन्या यांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या दावोस दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी ‘रायगड-पेण ग्रोथ सेंटर’ची घोषणा केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर बुधवारी या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

याठिकाणी ‘प्लग अँण्ड प्ले’ या धर्तीवर ‘रेडी टू स्टार्ट’ पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरु करू शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी असून, त्यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. याठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. बीकेसीच्या धर्तीवर याठिकाणी बिझनेस डिस्ट्रीक्ट स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाले आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in