
अगामी पावसाळ्यात उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. मान्सूनचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी दक्षिण-पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत-लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा-इगतपुरी विभागात विशेष भर देण्यात येत आहे.
रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या घटनांमुळे असुरक्षित आहे. ज्यामुळे सेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडतात. अशा कोणत्याही घटना रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने घाट परिसरात विशेष मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. सोमवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कल्याण-लोणावळा विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खबरदारी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत विना व्यत्यय रेल्वेसेवा सुरू राहतील, याबाबत काळजी घेण्यासही सांगितले. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. मध्य रेल्वे मार्गावर विविध मान्सूनपूर्व कामे सुरू असतानाच घाट परिसरात विविध मान्सून कामांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.