
मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या करायला हव्यात, असे सूतोवाच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी केले. शक्य असेल तिथे १५ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाट सक्षम करण्याची व्यवहार्यता तपासण्याची सूचना त्यांनी केली.
खार रोड स्थानकावरील सुधारणा कामाची पाहणी करताना ते बोलत होते. ‘मुंबईतील वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी १५ डब्यांच्या गाड्या गरजेच्या आहेत. कारण मुंबईतील लोकल सेवा ही पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत.
खार रोड रेल्वे स्थानकावर केले निरीक्षण
सतीश कुमार हे मुंबईत रात्री १०.०५ वाजता आले. १०.४० वाजता ते रात्री खार रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी रात्रौ ११.२० वाजेपर्यंत रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कामाची पाहणी केली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या कामाबद्दल कुमार यांनी समाधान व्यक्त केले. प्रवाशांना उच्च दर्जाची सुविधा देण्याची यावी, असा सल्ला कुमार यांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला. खार रोड स्टेशनचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यासाठी ८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३ अ अंतर्गत ९५० कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे.