मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या लेनचे काम हाती घेतले आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक लोकल रद्द करण्यात आल्याने दोन दिवसांपासून लोकल खोळंबा सुरूच आहे, तर शनिवारी कुर्ला येथे मालगाडी बंद पडल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा अर्धा तास ठप्प झाली होती. शिवाय हार्बरवरील गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले.
हार्बर मार्गावर ट्रॉम्बे यार्डातील मालगाडी कुर्ला कारशेडमध्ये जात असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बंद पडली. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गाडी सुरू केल्यानंतर १.३० वाजता लोकल सेवा पूर्ववत झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांत रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार असून प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण वेळा नियमित करण्यात येणार आहेत.
गर्दी कमी करण्यासाठी वेळेत बदल
दरम्यान, सकाळी ९.३० ते ५.४५ व दुसरी ड्युटी सकाळी ११.३० ते ७. ४५ या दरम्यान राहील. एक नोव्हेंबरपासून हे बदल अंमलात येणार असून एक तारखेला जे रोस्टर लागेल तेच त्या कर्मचाऱ्याला नंतर लागू राहणार आहे. त्यानंतर त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.