रेल्वेच्या कंत्राटदाराचा तब्बल २३ वर्षे फुकट प्रवास

पश्चिम रेल्वेवरील तिकीट तपासणीच्या विशेष भरारी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे
 रेल्वेच्या कंत्राटदाराचा तब्बल २३ वर्षे फुकट प्रवास

मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणे गुन्हा असून तिकीट तपासनिसांकडून अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र एका प्रवाशाने एक नाही, दोन नाही, तर तब्बल २३ वर्षे रेल्वेतून फुकट विनातिकीट प्रवास केला आहे. पश्चिम रेल्वेवरील तिकीट तपासणीच्या विशेष भरारी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. संबंधित प्रवासी रेल्वेचा कंत्राटदार असून त्यानेच रेल्वेला गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकावर तपासणी करत असताना भरारी पथकातील टीसी अब्दुल हजीज अब्दुल हमीद यांनी अमितकुमार पटेलकडे तिकिटाची मागणी केली. पटेलने रेल्वे ‘स्टाफ’ असल्याचे सांगितले. टीसीला संशय आल्याने त्याने ओळखपत्राची मागणी केली. पटेलने सन २०००मध्ये बनवलेले ओळखपत्र दाखवले. हे ओळखपत्र फाटलेल्या व खराब झालेल्या स्थितीत होते. यामुळे टीसीची शंका बळावली. त्याने पटेलकडे ग्रेड पेची विचारणा केली, त्यावेळी त्याला उत्तर देता आले नाही. दरम्यान, भरारी पथकातील अमितकुमार शर्मा, भावेश पटेल आणि अजय सारस्वत यांनी प्रश्नांचा भडिमार केला असता पटेलने आपण रेल्वे कर्मचारी नसून कंत्राटदार असल्याचे कबूल केले. दरम्यान, पटेल याच्याकडे असलेला पास हा गुजरातमधील कलोल रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्याचा आहे. या पासच्या आधारे त्याने बनावट रेल्वे पास तयार केला. त्यावर शिक्का मारण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

स्टाफ’ असल्याचे सांगत तपासनिसांना गंडा

उपनगरीय मार्गावर गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी फुकट रेल्वे प्रवास करतात. तर काही खोटे ओळखपत्र, आम्ही रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगत तिकीट तपासनिसांना गंडा लावतात. तिकीट तपासणी करताना अनेकदा काही प्रवासी ‘स्टाफ’ असल्याचे सांगतात. त्या प्रवाशांची तिकीट तपासनीस खातरजमा करत नाहीत. याचाच फायदा घेत एक-दोन नव्हे, तर तब्बल २३ वर्षे एका नागरिकाने मोफत रेल्वे प्रवास केला आहे. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाने तपासणी मोहीम सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in