माटुंगा स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड
माटुंगा स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या
Published on

मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकात एका ३७ वर्षांच्या रेल्वे कर्मचाऱ्याने लोकलखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या कर्मचार्‍याला अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध दादर रेल्वे पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. कोमल शर्मा, प्रेमप्रकाश आणि विकासकुमार अशी या तिघांची नावे असून, त्यांच्याकडून होणाऱ्या ब्लॅकमेल, बदनामीसह खंडणीच्या धमक्यांना कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार महिला मूळची गुजरातची रहिवाशी असून, सध्या ती तिच्या कुटुंबीयांसोबत डोबिवली येथे राहते. तिचे पती जगदीश हे रेल्वेमध्ये कामाला होते. सध्या त्यांची नेमणूक माटुंगा वर्कशॉप येथे होती. सोमवारी सकाळी सहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. यावेळी तिचे मुलांच्या शाळेसंदर्भात बोलणे झाले होते. दुपारी पावणेचार वाजता तिला दादर रेल्वे पोलिसांचा फोन आला होता. त्यांनी त्यांच्या पतीचा वर्कशॉपमध्ये अपघात झाला असून, तुम्ही तातडीने सायन रुग्णालयात या असे सांगितले. त्यामुळे ती तिच्या सासूसह इतर नातेवाईकांसोबत सायन रुग्णालयात आली होती. तिथे तिला तिच्या पतीने माटुंगा रेल्वे स्थानकात लोकलखाली आत्महत्या केल्याचे समजले होते. त्यांच्या खिशात पोलिसांना एक पत्र सापडले होते. त्यात त्यांनी त्यांची फेसबुकवर एका कोमल शर्मा नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली होती. तिने त्यांचे अश्‍लील व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in