मुंबईत ‘जल’धारा! रेल्वे, रस्ते वाहतूक विलंबाने, प्रवाशांचे हाल, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rains: मागील आठवड्यापासून पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. रविवारी संततधार पावसाने तडाखा दिल्यानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला.
मुंबईत ‘जल’धारा! रेल्वे, रस्ते वाहतूक विलंबाने, प्रवाशांचे हाल, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : मागील आठवड्यापासून पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. रविवारी संततधार पावसाने तडाखा दिल्यानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. जोरदार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतूक मंदावली. सकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे विलंबाने धावल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली. रेल्वे व रस्ते वाहतूकही विलंबाने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईत जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकरांना जुलैमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला. मागील आठवडाभर मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन-तीन दिवस संततधार पावसाने मुंबईला झोडपून काढले. शनिवारी व रविवारी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही पावसाने पहाटेपासून दमदार बरसायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य व हार्बर मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल उशिरा धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारपर्यंत संततधार कोसळल्यानंतर त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र अधूनमधून सरी कोसळत होत्या. मध्येच एखादी मोठी सर येत होती. त्यामुळे सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा झाला. मुंबई महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. अतिरिक्त पंप उपलब्ध करून साचणाऱ्या पाण्याचा उपसा केला. त्यामुळे सखल भागात पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. दरम्यान, हवामान विभागाने येत्या २४ तासांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

नाना चौक येथे इमारतीचा भाग कोसळून एक जखमी

संततधार पावसामुळे मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या. नाना चौकातल्या गवालिया टँक, मोतीलाल मेन्शन पटेल, कंपाऊंड येथील पाच मजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग पहिल्या मजल्यावर पडून एक ११ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. शिवम शहा असे त्याचे नाव असून त्याला बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

पावसाची नोंद -

मुंबई शहर २६ मिमी

पूर्व उपनगर १८ मिमी

पश्चिम उपनगर १४ मिमी

२० ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या

शहरात ७, पूर्व उपनगरांत ८ व पश्चिम उपनगरांत ५ अशा एकूण २० ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. यात कोणालाही मार लागलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in