रेल्वेच्या सुरक्षा बोटी ठरणार संकटमोचक

गाडीच्या दोनही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत शेकडो प्रवासी रात्रभर या एक्सप्रेसमध्ये अडकून पडले होते
रेल्वेच्या सुरक्षा बोटी ठरणार संकटमोचक

पावसाचा सर्वाधिक फटका उपनगरीय रेल्वे सेवेला बसतो. मुसळधार पावसाने काही वर्षांपूर्वी बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती. गाडीच्या दोनही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत शेकडो प्रवासी रात्रभर या एक्सप्रेसमध्ये अडकून पडले होते. यावेळी एन.डी.आर.एफ आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटींचा वापर सर्वाधिक करण्यात आला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय घेत उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूर परिस्थिती अथवा इतर सागरी संकटांचा सामना करण्यासाठी तब्ब्ल ५ बोटी आपल्या ताफ्यात तैनात केल्या आहेत. सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस पाहता रेल्वे सुरक्षा दलाने आपली विशेष पथके ठिकठिकाणी तैनात केली असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला आहे. सर्वाधिक सागरी हद्द असलेल्या मुंबई शहरातील हद्दीची सुरक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून राम भरोसे असल्याची बोंब मारण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात या बोटी प्रशासनाच्या संकटमोचक म्हणून वारंवार धावून आल्या आहेत. सुरुवातीला २ बोटी रेल्वे सुरक्षा दलाकडे होत्या. परंतु काही वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये बदलापूर वांगणी येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकून पडल्याची घटना घडली. मुसळधार पाऊस, रेल्वेतील खंडित झालेला वीजपुरवठा आणि पुराच्या पाण्यात अडकलेल्या या एक्सप्रेसमध्ये जवळपास शेकडो प्रवासी अडकून पडले होते. आजूबाजूच्या गावांशी पावसामुळे तुटलेला संपर्क, गावच्या गावे वाहून गेल्याने मदतकार्य पोहचण्यास देखील मोठ्या प्रमाणात उशीर झाला होता. अशा परिस्थितीत एन.डी.आर.एफ आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी दाखल होत हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटींच्या सहकार्याने मदतकार्य सुरु केले.

या घटनेनंतर मान्सूनपूर्व कामे आणि रेल्वे सुरक्षा दलाला पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या विविध समस्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा प्रशासकडून उपलब्ध करण्यात आल्या. यामध्ये विशेष पथके, सुरक्षा बोटींमध्ये वाढ, पूर्वपरिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष शिबिरे आणि प्रशिक्षण देण्यात आले. सद्यस्थितीत रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असली तरी काहीअंशी निसर्गापुढे हतबल होण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथके स्थापन करत, प्रशिक्षण देत आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in