रेल्वे, शाळा, मंदिर परिसर फेरीवाला मुक्त - आश्विनी जोशी

मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.
रेल्वे, शाळा, मंदिर परिसर फेरीवाला मुक्त - आश्विनी जोशी

मुंबई : शाळा, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या विभाग पातळीवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी 'दैनिक नवशक्ति' बोलताना सांगितले. दरम्यान, देवनार पशुवधगृहाचे नुतनीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचे आश्विनी जोशी म्हणाल्या.

मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. मुंबई फेरीवाला मुक्तीसाठी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर अंतर फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी यापुढे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरासह शाळा, धार्मिक स्थळे फेरीवाला मुक्त करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा येईल, असा विश्वास आश्विनी जोशी यांनी व्यक्त केला.

देवनार पशुवधगृहाचे नुतनीकरण लवकरात लवकर करण्यासाठी संबंधित विभागाला नवीन आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. नवीन आराखड्यानुसार देवनार पशुवधगृहाचे नुतनीकरण करण्यात येईल, असे ही त्या म्हणाल्या.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, मोकळी जागा मिळेल तिकडे बेकायदा फेरीवाले बस्तान मांडत आहेत. बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा बसत असून मुंबईचे पदपथ पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोकळे असणे गरजेचे आहे. त्यामुळे पदपथ फेरीवाला मुक्त करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आल्याचे आश्विनी जोशी यांनी सांगितले.

एक लाख ३५ हजारांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई!

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत मुंबईतील १ लाख ३५ हजार ५६३ बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

जानेवारी ते सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत अशी केली कारवाई

जानेवारी - १२७६१

फेब्रुवारी - १६,१२८

मार्च - १६,१२७

एप्रिल - १३,४२३

मे - १७,८०६

जून - १८,१०९

जुलै - १४,००३

ऑगस्ट - १५,२६२

सप्टेंबर - ११,९५४

logo
marathi.freepressjournal.in