प्रभादेवी पूल पाडण्यासाठी रेल्वे घेणार आज पहिला ब्लॉक; धीम्या मार्गावर साडेसात तासांचा ब्लॉक

ब्लॉक कालावधीत प्रवाशांना वांद्रे ते दादर ते माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची परवानगी असेल.
प्रभादेवी पूल पाडण्यासाठी रेल्वे घेणार आज पहिला ब्लॉक; धीम्या मार्गावर साडेसात तासांचा ब्लॉक
Published on

मुंबई : प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) पाडण्यासाठी डाउन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री ११:३० ते ७ वाजेपर्यंत ७.३० तासांचा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांना वांद्रे ते दादर ते माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची परवानगी असेल.

चर्चगेट इत्यादी ठिकाणाहून महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवीला प्रवास करू इच्छिणारे प्रवासी दादर येथे उतरून त्याच तिकिटावर विरुद्ध दिशेने म्हणजेच अप धीम्या मार्गावरून या स्थानकांपर्यंत प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे, चर्चगेट इत्यादी ठिकाणाहून माटुंगा रोड आणि माहीमला प्रवास करू इच्छिणारे प्रवासी वांद्रे येथे उतरून त्याच तिकिटावर विरुद्ध दिशेने म्हणजेच अप धीम्या मार्गावरून प्रवास करू शकतात. काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

ग्रँट रोड-मुंबई सेंट्रलदरम्यान १३ तासांचा ब्लॉक

पूल क्रमांक ५ च्या पुनर्बांधणीचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर १३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे.

काही गाड्या रद्द केल्या जाणार

ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट दरम्यानच्या सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गांवरून चालवल्या जातील. डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या चर्चगेट आणि माहीम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे सर्व डाऊन धीम्या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत तसेच अपुऱ्या प्लॅटफॉर्मच्या लांबीमुळे लोअर परळ आणि माहीम स्थानकांवरही थांबणार नाहीत. ब्लॉकच्या काळात काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील आणि चर्चगेटच्या काही गाड्या वांद्रे, दादर स्थानकापर्यंतच चालवल्या जातील आणि तेथूनच परत फिरतील.

logo
marathi.freepressjournal.in