दोन दिवसांच्या पावसात ८ हजार तक्रारींचा पाऊस; पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे फोन खणाणले
मुंबई : रविवार रात्री ते सोमवार सकाळपर्यंत बरसलेल्या पावसामुळे मुंबईत पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्ते जलमय, बत्तीगुल, झाड झाडांच्या फांद्या कोसळणे अशा प्रकारच्या ८ हजारांहून अधिक तक्रारी दोन दिवसांच्या पावसात पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षातील १९१६ या टोल फ्री क्रमांक तक्रारींचा पाऊस पडला. दरम्यान, प्राप्त तक्रारींचे वेळीच निवारण करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रविवार ७ जुलैला मध्यरात्री १ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पावसाने मुंबई शहर व उपनगरात दाणादाण उडविली. या सहा तासांत तब्बल ४०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक भागांत पाऊस तुंबल्याचे प्रकार समोर आले. भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी आदी भागात पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे दिसून आले.
स्पॉट व्हिजिट करून कारणे शोधा
अतिवृष्टीत कुर्ला, भांडूप आणि चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी स्पॉट व्हिजिट करून पाणी का तुंबले याची कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले.
ज्या भागात पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे आढळून आले होते, त्या भागांमध्ये अधिक पंप बसविणे किंवा अधिक क्षमतेचे पंप बसविणे यासारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच मुंबईतील रेल्वेसेवा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले.