मुंबईत पावसाची हजेरी! २१ जूननंतर जोरदार बरसणार

मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून २१ जूननंतर पाऊस अधिक सक्रिय होईल आणि जून अखेरपर्यंत जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत पावसाची हजेरी! २१ जूननंतर जोरदार बरसणार

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासून अधूनमधून ढगाळ वातावरणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चिंचपोकळी, लालबाग, दादर, वांद्रे, कुर्ला, चेंबूर आदी परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून २१ जूननंतर पाऊस अधिक सक्रिय होईल आणि जून अखेरपर्यंत जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत २१ जूननंतर जोरदार पाऊस पडणार

दरवर्षी केरळमध्ये १ जूनपर्यंत पाऊस दाखल होतो आणि मुंबईत ११ जूनपर्यंत येतो. त्यानंतर तो राज्यात पसरतो. मात्र यंदा केरळात ३१ मे रोजी, तर मुंबईत ९ जून रोजी मुंबईत पाऊस सुरू झाला. आता पावसाला सुरुवात झाली, असे सर्वांना वाटले. मात्र पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याने पाठ फिरवली. परंतु पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून २१ जूननंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सक्रिय होईल. मुंबईत चार महिन्यांत जुलै महिन्यात ४० टक्के पाऊस बरसतो. यंदाही जून महिन्यात पावसाची दमदार इनिंग होईल, असे कुलाबा हवामान विभागाचे प्रमुख अधिकारी सुनील कांबळे यांनी दैनिक 'नवशक्ति' सांगितले आहे.

मुंबई मान्सून लाइव्हवर पावसाची अपडेट

मुंबईत कुठल्या भागात किती पाऊस बरसला, १५ मिनिटांपूर्वी किती, अर्ध्या तासापूर्वी किती आणि मागील २४ तासांत किती पाऊस बरसला याची संपूर्ण अपडेट मुंबईकरांना मिळावी यासाठी ‘मुंबई मान्सून लाइव्ह’ वेबसाइट उपलब्ध केली आहे. या वेबसाइटवर कुठे व किती वाजता पाऊस पडेल याची माहिती अचूकपणे दिली असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांनी ‘मुंबई मान्सून लाइव्ह वेबसाइट’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. 

दरम्यान, मुंबईत दोन दिवसआधीच मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जोरदार कोसळला. त्यानंतर मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. मंगळवारी सकाळ उन्हाचे कडक चटके जाणवत होते, मात्र दुपारपासून मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण होत गेले आणि मुंबईच्या काही भागात हलक्या सरी कोसळल्या. अधूनमधून ढगाळ वातावरण होत काहीसा गारवा जाणवला. त्यामुळे मुंबईत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. दादर, वांद्रे, लोअर परळ, वडाळा, चेंबूर, फोर्ट, भायखळा, कुलाबा आदी भागात पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र हलक्या सरी कोसळल्यानंतर पाऊस विश्रांती घेत असल्याने पुन्हा उकाडा वाढत असल्याचे चित्र आहे.

logo
marathi.freepressjournal.in