
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
मागील दोन तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतलेली असली तरी उष्णतेत वाढ झाली. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी सकाळी व दुपारी मेघगर्जनेसह मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाने हलकी झलक दाखवली असली, तरी पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान खात्याकडून यलो अलर्ट
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या यलो अलर्टमुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.