
आशिष सिंग/मुंबई
कथित अश्लील व्यवसाय प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती व उद्योगपती राज कुंद्रा यांचा जबाब नोंदवला आहे. कुंद्रा यांच्या गेल्या महिन्यातील नियोजित विदेश दौऱ्याआधी ईडीच्या बलार्ड इस्टेट कार्यालयात चौकशी झाली.
दुसऱ्या समन्सनंतर कुंद्रा तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 'हॉटशॉट्स' या मोबाइल ॲपद्वारे अश्लील सामग्रीच्या निर्मिती आणि वितरणात त्यांच्या कथित सहभागाबाबत ईडीने कुंद्रा यांना चौकशीदरम्यान विचारले.
तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले केले, कुंद्रा यांनी २०१९मध्ये आर्मस्प्राईम कंपनीद्वारे हॉटशॉट्स ॲप विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर हे ॲप केनरिन या ब्रिटनस्थित कंपनीला २५ हजार डॅलरमध्ये विकले.
विक्रीनंतरही कुंद्रा यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजने केनिरनसोबत तांत्रिक सल्लागार सेवा कायम ठेवली.
वियान इंडस्ट्रीज लिमिटेडने केनरिनला पुरवलेल्या सेवांबाबत ईडीने चौकशी केली. यामध्ये तांत्रिक, परिचलन, ग्राहक सेवा आणि तृतीय पक्ष साधनांच्या सहाय्याचा समावेश होता.
कंपनीने बिलिंग सिस्टम, ऑनलाइन पेमेंट प्रणाली आणि इतर सेवा कशा प्रकारे दिल्या याचा तपास करण्यात आला. वियान इंडस्ट्रीज आणि इतर संबंधित कंपन्यांमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळवून आर्थिक व्यवहार आणि त्यातील गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, असे ईडीचे म्हणणे आहे.