

मुंबई : दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. नालेसफाईची कामे संथगतीने सुरू आहे. मुंबईतील वाहतूककोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईतील वाहतूककोंडीला बेकायदा पार्किंग कारणीभूत आहे, अशा विविध प्रश्नांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याबरोबर चर्चा केली. राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आयुक्तांचे लक्ष वेधले. दरम्यान, मुख्यालयात मनसे कार्यालयासह ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष कार्यालयालाही भेट दिली.
मुंबई शहरात सुरू असलेली विकासकामे, वाढते प्रदूषण, वाहतूककोंडी असे विविध प्रश्न राज ठाकरे यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासमोर मांडल्याचे समजते. मुंबईत वाढणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात जागोजागी वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीला जबाबदार तेवढेच रस्त्यावर होणारे पार्किंगही असल्याचे भेटीदरम्यान त्यांनी आयुक्त भिडे यांना सांगितले. त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंगवर मोठा दंड आकारून कारवाई करावी जेणेकरून पार्किंग होणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे पालिका गटनेते यशवंत किल्लेदार तसेच मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवकही उपस्थित होते.