"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवातच पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेनं सुरु केली.
राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई: राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथे होत आहे. या सभेच्या निमित्तानं राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले. दरम्यान राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवातच पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेनं सुरु केली.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

आज मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा पार पडणार आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होत आहे. दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात पंडित नेहरूंचं नाव घेऊन केली. "पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी... " असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

राज ठाकरेंकडून पंतप्रधानांचं कौतुक-

राज ठाकरेंनी राममंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. नरेंद्र तुम्ही नसता तर राम मंदिर झालंच नसतं, असं राज ठाकरे म्हणाले. याशिवाय कलम ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाबद्दलही राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणीही राज ठाकरेंनी केली.

logo
marathi.freepressjournal.in