

मुंबई : कल्याण-डोंबिवलीप्रमाणे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना मुंबईत महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्ताचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी खंडन केले. मी सांगतो ना, नाही म्हणजे नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप पाठिंब्याची चर्चा फेटाळून लावली.
मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षाकडून नवनिर्वाचित नगरसेवकांची गटनोंदणी सुरू आहे. ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. मनसेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतही मनसे भाजपला समर्थन देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
पराभूत उमेदवारांना केले मार्गदर्शन
राज ठाकरे यांनी सोमवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीवेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आपला पक्ष मुंबईत भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची कारणे जाणून घेतली. निवडणुकीची जबाबदारी ज्या पदाधिकाऱ्यांवर होती, त्यांची झाडाझडती घेतली.