महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रचार करणार
ANI

महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रचार करणार

राज ठाकरे यांनी या अगोदर महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

विशेष प्रतिनिधी/मुंबई

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ नेहमीच धडाडत राहते. परंतु अलीकडे ते कोणत्या ना कोणत्या पक्षासाठी मैदानात उतरून आक्रमक प्रचार करताना दिसत आहेत. मागच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार केला होता. मात्र, यावेळी ते आता महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. गुढीपाडव्यादिनी मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आता ते लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रचार करणार आहेत. त्यासंबंधीची घोषणा शनिवारी त्यांनी केली. त्यामुळे महायुतीसाठी आता राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

राज ठाकरे यांनी या अगोदर महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीत आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. प्रचाराची जबाबदारी मनसेच्या नेत्यांवर सोपविण्यात येणार असून, त्याची यादी एक ते दोन दिवसांत जाहीर केली जाईल. विशेषत: भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने मनसेच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क करायचा आणि समन्वय साधायचा, यासंदर्भात यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

राम मंदिराचा प्रश्न मोदींमुळे मार्गी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिराचा प्रलंबित मुद्दा मार्गी लागला. कदाचित मोदी पंतप्रधान राहिले नसते, तर राम मंदिराचा प्रश्न तसाच रखडला असता. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांनाच पाठिंबा देणे गरजेचे आहे. याचा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

विकासाचे मुद्दे मोदी पूर्ण करतील असा विश्वास

आणखीही विकासाचे अनेक मुद्दे आहेत. तेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूर्ण करतील आणि तरुणांचा रोजगार असेल, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्दा असेल, असे विषय ते मार्गी लावतील, याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे मोदी यांच्यासाठी मनसे मैदानात उतरणार आहे. महायुतीत समन्वय राहावा आणि प्रचार करण्यासाठी सुलभ जावे, यादृष्टीने आजची बैठक झाली. महायुतीच्या नेत्यांशी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने लवकरच यादी जाहीर केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात मनसे नेते, पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे आणि त्याची यादी महायुतीच्या नेत्यांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मोदींनी इतर राज्यांतही लक्ष द्यावे

पंतप्रधान मोदी यांचे गुजरात प्रेम सर्वश्रुत आहे. परंतु त्यांनी इतर राज्यांतही त्याच पद्धतीने लक्ष द्यावे. महायुतीला पाठिंबा देण्यापूर्वी या मुद्यावरून बराच खल झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे बारकाव्याने लक्ष घालून इतर राज्यांचाही विकास साधण्यासाठी प्रयत्न करतील, याची खात्री आहे. ही वेळ त्यांना पाठिंबा देण्याची आहे. त्यामुळे आम्ही खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in