Raj Thackeray : 'मी चेहरे वाचतो'; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काय म्हणाले राज ठाकरे?

आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली
Raj Thackeray : 'मी चेहरे वाचतो'; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काय म्हणाले राज ठाकरे?

आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पनवेलमध्ये राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलखातील विषय, 'ठाकरे काय वाचतात?' असा होता. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट एका शब्दात उत्तर दिले की, "मी चेहरे वाचतो," आणि उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ते म्हणाले की, "रोज मला इतकी माणसे भेटायला येतात, की मी त्यांचे चेहरे वाचतो. मी माणसं वाचतो, म्हणजेच कोण बरोबर राहणार आणि कोण जाणार? हे बरोबर कळते,", अशी मिश्किल टिपणी यावेळी त्यांनी केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "मला वाचनाची आवड ही व्यंगचित्रामुळेच झाली. सध्या चांगले लिहिणारे, विषय समजून सांगणारे लेखक गिरीश कुबेर आहेत. त्यांची पुस्तके मी वाचतो, त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचे लेखन उत्तम असते. तसेच, अनिता पाध्ये यांचे 'एकटा जीव' हे अभिनेते दादा कोंडकेंचे आत्मचरित्र, मला खूप आवडते. ते पुस्तक वाचायला कुठूनपण सुरुवात करा, तरी तेवढीच मजा येते. म्हणून मी ते पुस्तक नेहमी वाचतो."

दरम्यान, बातम्यांसंदर्भात विचारल्यानंतर राज ठाकरेंना विचारण्यात आले की, "तुम्ही सामना आणि मार्मिक वाचता का?" यावर त्यांनी सरळ, "नाही' म्हणून उत्तर दिले. घरी येत असले तरीही मी नाही वाचत, असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की “हल्ली वर्तमानपत्रांमध्ये वाचण्यासारख्या बातम्या फार नसतात. न्यूज चॅनल्स तर बघवतच नाहीत,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी टीकाकारांना टोलादेखील लगावला.

राज ठाकरेंना विचारण्यात आले की, "तुम्ही एवढं वाचन करता तरीही विरोधक म्हणतात की, 'राज ठाकरेंनी थोडं वाचन वाढवावे' असे म्हणतात तेव्हा काय वाटत?" यावर ते म्हणाले की, "हा त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे. मला फरक पडत नाही," असे म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांवर बोलणे टाळले. गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in