जे सुरू आहे त्याची शिसारी आलीय - राज ठाकरे

‘बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते, ते कुणालाही समजले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर मला व्याख्यान द्यायला आवडेल’, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
जे सुरू आहे त्याची शिसारी आलीय - राज ठाकरे
(Photo-X/@ShivSenaUBT_)
Published on

‘बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते, ते कुणालाही समजले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर मला व्याख्यान द्यायला आवडेल’, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ‘आज, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे शिसारी आली. बाळासाहेब आज नाहीत त्यामुळे बरंच झालं, नाहीतर त्यांना वेदना झाल्या असत्या’, असेही ते म्हणाले. यापुढे मराठीच्या मुद्द्यावर कायम लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त शुक्रवारी षन्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी संजय राऊत आणि अमित ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. ‘सामना’मध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना कसं पाहायचं, त्यांना कसं मांडायचं हा प्रश्न अनेकदा उभा राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचित्रकार, राजकारणी असे त्यांचे अनेक पैलू आहेत.

कल्याण-डोंबिवलीवर भाष्य

आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय की बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते? अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

पक्ष नाही घर सोडावं लागलं होतं...

जुनी आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्ष सोडणं हे माझ्यासाठी नव्हतं, ते घर सोडणं होतं. त्यानंतर मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या. झालं गेलं ते आता सोडून द्या.

प्रमोद महाजनांसोबतचा किस्सा

राज ठाकरेंनी यावेळी बाळासाहेब आणि प्रमोद महजानांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, ‘या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेन असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यावर प्रमोद महाजन यांनी ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर 'मी तसं करायला लावेन', असे बाळासाहेब म्हणाले. आज जे हिंदुत्वाच्या नावाने आरडाओरडा करतात त्यांना त्यावेळी ही कल्पनाही नव्हती. आज त्याच लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडलाय’.

बाळासाहेबांसारखा दुसरा कलाकार झाला नाही...

देशात त्यांच्यासारखा दुसरा कलाकार झाला नाही. बाहेर दंगली किंवा राजकीय रणधुमाळी सुरू असतानाही बाळासाहेब शांतपणे व्यंगचित्र काढत असत. ती केवळ चित्रे नव्हती, तर ती त्यांची 'समाधी' होती. बाहेर त्यांच्याविषयी काहीही सुरु असले तरी त्यांची पेन्सिल आणि त्यांचा विनोदही हलला नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

logo
marathi.freepressjournal.in