मुंबई: गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाला भेट दिली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी आमंत्रण दिले होते.
उद्धव ठाकरे यांनी ते स्विकारत राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
यंदा २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. तेव्हा राज ठाकरे यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'वर्षा' निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली.