राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर

हिंदी भाषा सक्तीला विरोध करत तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढली असून रविवारी पुन्हा एकदा राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर
Published on

मुंबई : हिंदी भाषा सक्तीला विरोध करत तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढली असून रविवारी पुन्हा एकदा राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम वांद्रे येथील एमसीएच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या कुटुंबासोबत पोहोचले होते. दोन्ही बंधू या कार्यक्रमात एकमेकांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. यानंतर राज ठाकरे हे घरी न जाता, थेट उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी पोहोचले. महत्त्वाची बाब म्हणजे, एमसीए सभागृहाबाहेर येऊन उद्धव ठाकरे हे राज ठाकरे गाडीत बसेपर्यंत उभे होते. त्यामुळे राज ठाकरे हे ‘मातोश्री’ येथे येतील, असे कोणालाच वाटले नव्हते. पण अचानक २.३० वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे हे ‘मातोश्री’वर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘मातोश्री’वर राज ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे होत्या, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बंधूंमधील चर्चा ‘मातोश्री’च्या पहिल्या मजल्यावर शांत वातावरणात झाली. या चर्चेचा विषय उघड न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, दोन्ही कुटुंबांमधील वाढती जवळीक पाहता, ठाकरे बंधूंचे संबंध नव्या अध्यायाकडे वळत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in