
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचा नियोजित अयोध्या दौरा शुक्रवारी स्थगित केल्याचे समाज माध्यमांवरून जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. राज ठाकरे यांनी गुडघ्याच्या दुखण्याचे कारण देत दौरा स्थगित केला असला, तरी युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर ते आपला दौरा जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांनी येत्या ५ जूनला अयोध्या येथे राम मंदिराला भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेश येथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांनी जोरदार विरोध केला आहे. तसेच मुंबईतील उत्तर भारतीयांचाही त्यांच्या या दौऱ्याला विरोध आहे. भाजपच्या मुंबई येथील उत्तर भारतीय मंचनेही राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला होता. बृजभूषण सिंग यांनी, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला असून त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी अचानक आपला दौरा स्थगित करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले जात आहेत; मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर दौरा केल्यास राजकीयदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता असल्याचा कयास आहे. त्यामुळे आधीच दौरा स्थगित करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. दौरा रद्द केल्यानंतर यासंदर्भात आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे आपली भूमिका सोमवारी (ता. २२) पुणे येथे होणाऱ्या सभेत जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.