राजावाडी रुग्णालयाचा होणार कायापालट, ७०० कोटी खर्चणार; पुनर्विकासानंतर सुसज्ज १२०० खाटा

कोरोनाच्या महासाथीत आलेल्या अनुभवातून धडा घेत मुंबई महापालिकेने घाटकोपर पश्चिमेच्या राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाची योजना तयार केली आहे. त्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
राजावाडी रुग्णालयाचा होणार कायापालट, ७०० कोटी खर्चणार; पुनर्विकासानंतर सुसज्ज १२०० खाटा
Published on

शिरीष पवार

मुंबई : कोरोनाच्या महासाथीत आलेल्या अनुभवातून धडा घेत मुंबई महापालिकेने घाटकोपर पश्चिमेच्या राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाची योजना तयार केली आहे. त्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

राजावाडी रुग्णालयाची सुधारणा आणि क्षमता वाढविण्याच्या योजनेस पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. हे रुग्णालय ६८ वर्षे जुने आहे. त्याचा पुनर्विकास दोन टप्प्यांत केला जाणार आहे. पुनर्विकासाची योजना तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून त्याला १४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या रुग्णालयातील खाटांची संख्या सध्या पाचशे असून ती बाराशेपर्यंत वाढविली जाणार आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे कुर्ला ते मुलुंडपर्यंतच्या नागरिकांना शीवचे लोकमान्य टिळक रुग्णालय तसेच परळचे केईएम रुग्णालय गाठावे लागते. तेथील रुग्णांचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. शीव रुग्णालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. तसेच राजावाडी रुग्णालयात रुग्णांना उपचारांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. तेथे सध्या पाचशे खाटांची सुविधा आहे. परंतु तेथे बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन हजार रुग्ण येतात. तसेच दररोज चारशे रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालयाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी रुग्णालयाकडून पालिकेकडे सातत्याने केली जात होती.

राजावाडी रुग्णालयाचे सध्याचे क्षेत्रफळ १६ हजार ८८३ चौरस मीटर आहे. ते १ लाख चार हजार ४४९ चौरस मीटर इतके वाढविले जाणार आहे. त्यासाठी पाच चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर केला जाणार आहे. आता सल्लागारांकडून तेथील इमारतीचा आराखडा, जागेचे सर्वेक्षण, मातीपरीक्षण, अग्निशमन यंत्रणा, टेंडर प्रक्रिया याबाबत निश्चिती केली जाणार आहे.

सध्याच्या सेवा सुरू ठेवून कामे

राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करताना तेथे सध्या सुरू असलेल्या रुग्णालयीन सेवांवर कोणताही परिणाम होऊ न देता कामे केली जाणार आहेत. ही कामे दोन टप्प्यांत केली जातील. यातील प्रत्येक टप्पा हा अडीच वर्षांचा असेल. कार्यादेश निघाल्यापासून पाच वर्षांत कामे पूर्ण केली जातील.

राजावाडी रुग्णालयाच्या विस्ताराची मागणी लक्षात घेता या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

- संजय कुऱ्हाडे, उपायुक्त, रुग्णालये पायाभूत सुविधा विभाग

logo
marathi.freepressjournal.in