मुंबई : भारतीय जनता पक्ष कुणालाही राज्यसभेची तिसरी टर्म देत नसल्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्हाला संधी देऊ, असा स्पष्ट संदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिला होता. मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात परत येऊ इच्छित नसल्याचे आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ शब्दात सांगितल्यानंतर चक्रे फिरली आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रयत्नांमुळे आठवले यांची राज्यसभा पक्की झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत रामदास आठवले म्हणाले की, भाजप तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी देत नाही हे वास्तव आहे. पण मी भाजपचा नव्हे रिपाइंचा राज्यसभा सदस्य होतो. त्यामुळे हा नियम मला लागू होत नाही. नितीन नबीन व फडणवीस यांची या संदर्भात भेट झाली तेव्हा मी दिल्लीत राहणे कसे आवश्यक आहे हे मी त्यांना सांगितले. तसे मेसेज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केले होते. अखेर मला राज्यसभेवर पुन्हा संधी दिली गेली.
होळीच्या दिवशी नितीन नबीन व आठवले यांची भेट झाली. त्यावेळी भाजपचा राज्यसभेबाबतचा दंडक नबीन यांनी आठवले यांच्या कानावर घातला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्नासन दिले. त्यानंतर आठवले हे धुळवडीच्या दिवशी मुंबईत आले व त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपण दीर्घकाळ दिल्लीतील राजकीय वर्तुळात घालवला असल्याने आपल्याला पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्यात रस नाही. त्यापेक्षा माझ्या काही पदाधिकाऱ्यांना महामंडळांवर नियुक्त करा, अशी मागणी आठवले यांनी केली. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आठवले हे बैठक करीत असताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना फोन केला व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना दुसरे दिवशी फोन करून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत असल्याचे कळवले.
विधानपरिषदेत उद्धव यांची निवड होणे महत्त्वाचे - राऊत
युतीच्या राजकारणामुळे विजयी होणाऱ्या एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्यास भाग पाडल्यानंतर शिवसेनेने (ठाकरे) आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी एमव्हीए जिंकू शकणाऱ्या निश्चित जागेवर दावा केला आहे. ठाकरे हे विधिमंडळात मजबूत विरोधी पक्षाचा आवाज आहेत आणि त्यांची पुन्हा निवड होणे महत्त्वाचे आहे, असे शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पुन्हा निवडीसाठीच्या शुभेच्छांचा हवाला देत सांगितले.
२०१४ मध्ये राजनाथ यांनीच केली होती मदत
भाजपच्या कोट्यातून २०१४ मध्ये रामदास आठवले हे राज्यसभेवर गेले तेव्हा राजनाथ सिंह यांनीच त्यांची पाठराखण केली होती. भाजपच्या प्रकाश जावडेकर यांच्या ऐवजी आठवले यांना त्यावेळी संधी दिली गेली होती .
आठवले यांची ही खेळी तर नव्हे ?
केंद्रातील सत्तेत रिपाइं सहभागी असला तरी आठवले यांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना सत्तेचा वाटा मिळालेला नाही. तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाताना आपल्यालाही आव्हानांचा सामना करावा लागला व महाराष्ट्रात परतण्याची ऑफर दिली असताना आपण पदाधिकाऱ्यांना महामंडळांवर नियुक्ती करण्याची मागणी केली होती, हा संदेश आपल्या केडरला देण्याकरिता आठवले यांनीच ही खेळी तर खेळली नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.